By Dr Nitin Jadhav, Joint Director, CYDA
“ग्रामसभा” हा शब्द आणि संकल्पना आपण लहानपणी नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना ऐकला असेल, आता नागरिकशास्त्रला ‘सामाजिक शास्त्र म्हणजेच सोशल स्टडीज’ या नावाने ओळखला आणि शिकवला जातो. पण दुर्देवाने या विषयाचा संबंध फक्त अभ्यास करण्यापुरता राहतो आणि लहानपणीच संपून जातो. हे जास्त करून शहरी भागातल्या नागरिकांसाठी तर नक्कीच लागू होते. गावातल्या मुलांना/लोकांना ग्रामसभा आणि स्थानिक पंचायत राज याबद्दल अजूनतरी माहिती, आस्था आणि महत्व आहे.
‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अंड अक्टीव्हीटीज’ – सायडा ही संस्था नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये १० गावांमध्ये के कॉर्प फौंडेशनच्या सहयोगाने आरोग्य आणि पोषणावर काम करीत आहे. याचा प्रोजेक्टचा भाग म्हणून ग्रामसभा आणि त्याबद्दलची सद्यस्थिती प्रत्यक्ष एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सहभागी होऊन अनुभवायला मिळाली, त्याचाचं विश्लेषण करणारा हा लेख!
ग्रामसभेचा इतिहास आणि महत्व
ग्रामसभा आपल्या पंचायत राज व्यवस्थेचा आणि भारताच्या संविधानिक राज्यघटनेचा एक अविभाज्य घटक आहे. भारतीय संविधानातील कलम 243(b) नुसार ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व प्रौढ नागरिकांची सभा होय. म्हणजेच, एखाद्या गावातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व मतदार मिळून ग्रामसभा भाग असतात. पंचायत राज व्यवस्थेमध्ये एक प्रमुख, सर्वात मोठी आणि कायमस्वरूपी यंत्रणा/संस्था म्हणून ग्रामसभेचे महत्व आहे.
पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामपंचायत, पंचायत समिती (तालुका पंचायत) आणि जिल्हा परिषद या लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी बनलेल्या असतात. पण ग्रामसभा ही प्रौढ गावक-यांची म्हणजेच मतदारांची सभा आहे. ग्रामसभेची सर्वात महत्वाची ताकत म्हणजे ग्रामसभेने घेतलेले निर्णय कोणत्याही इतर संस्थेला रद्द करता येत नाहीत. ग्रामसभेचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार फक्त ग्रामसभेलाच आहे.
राज्यांच्या पंचायतराज कायद्यांनुसार ग्रामसभेची किमान दोन ते चार वेळा दरवर्षी बैठक घेणे आवश्यक आहे. लोकांच्या सोयीसाठी बहुतेक राज्यांमध्ये चार राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय दिवस हे ग्रामसभा घेण्यासाठी संदर्भ दिन म्हणून ठरवले आहेत. ते म्हणजे –प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी); मजूर दिन (१ मे); स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि गांधी जयंती (२ ऑक्टोबर)
यापलीकडे जाऊन गावक-यांना आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या सोयीप्रमाणे इतर दिवशीही ग्रामसभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. इतर वेळी ग्रामसभा घेण्यासाठी जर किमान १०% ग्रामसभा सदस्य किंवा ५० गावकरी (यापैकी जे जास्त असतील) एखाद्या विषयावर चर्चा करायची किंवा ठराव मांडायचा इच्छित असतील, तर ते ग्रामपंचायत सचिवांकडे (ग्रामसेवक) लिखित विनंती सादर करून ग्रामसभेची बैठक बोलावू शकतात.
थोडक्यात, ग्रामसभा ही पंचायती राज व गावाच्या विकासाची मुख्य आधारस्तंभ आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून लोक स्थानिक शासन व विकास विषयांवर चर्चा करतात आणि गावासाठी गरजेनुसार योजना तयार करतात.
पंचायत ही ग्रामसभेच्या मार्गदर्शनाखाली, देखरेखीखाली आणि देखरेखीत विकास कार्यक्रम राबवते. पंचायतचे सर्व निर्णय ग्रामसभेतूनच घेतले जातात आणि ग्रामसभेच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय अधिकृत व वैध ठरत नाही.
ग्रामसभेमध्ये सायडा संस्थेचा सहभाग

तसे पहिले तर ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतमध्ये राहणा-या प्रौढ गावका-यांशिवाय बाहेरच्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेला ग्रामसभेमध्ये सहभागी होणे अवघड असते. पण सायडा संस्थेच्या स्टाफने सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामसभेला सहभागी होण्यासाठी रीतसर लिखितपणे परवानगी घेतली होती. आणि त्यांनी परवानगी देण्याचे एक प्रमुख कारण होते की, या ग्रामसभेमध्ये सायडा संस्थेने गावातील ‘महिला व बाल आरोग्य-पोषण’ या विषयावर ग्रामसभेमध्ये माहिती आणि चर्चा घडवून आणली. आणि ग्रामसभेमध्ये आरोग्य-पोषण संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले-
- आपत्कालीन परिस्थितीत प्रसूतीसाठी जाणा-या गर्भवती महिलेला वेळेवर वाहनव्यवस्था करून देण्याची जबाबदारी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य घेतील. या वाहनाचे इंधनखर्च ग्रामपंचायत उचलेल.
- कुपोषित मुलांना सामान्य अवस्थेत आणण्याची जबाबदारी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली आहे, यासाठी ते सायडा संस्थेची मदत घेतील.
- सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गाव आरोग्य समिती (VHNSC) सदस्य प्रत्येक सार्वजनिक संस्थेला – जसे की अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, रेशन दुकान, जिल्हा परिषद शाळा इ. – भेट देतील, तेथील समस्या समजून घेतील आणि त्यावर कार्यवाही करतील.
सायडा टीमसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयांवर काटेकोरपणे पाठपुरावा करणे.
सध्याच्या ग्रामसभेबद्दल गावातल्या विविध घटकांची मते-
ग्रामसभेदरम्यान गावातील लोक, ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली, त्यात त्यांचे ग्रामसभेकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि मत समजण्याचा प्रयत्न केला.

ग्रामसभेबाबत लोकांचा दृष्टिकोन
गावक-यांना वाटते की, ग्रामसभा हीच एक प्रभावी व सक्षम व्यासपीठ आहे, जिथे ते आपल्या अडचणी व प्रश्न मांडू शकतात. ग्रामसभे दिवशी ग्रामसेवक तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळते.
एका व्यक्तीने सांगितले की – “आम्ही गेल्या महिन्याभरापासून ग्रामसभेची वाट पाहत होतो. आता आम्ही ग्रामसेवकाला व अप्रत्यक्षपणे सरपंच आणि पंचायत सदस्यांना अनेक प्रश्न विचारणार आहोत.”
पण यावर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की – लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ग्रामसभेसाठी का थांबावे लागते? ग्रामसभा ही फक्त प्रश्न विचारण्याचे व्यासपीठ आहे का, की लोकांना त्यांच्या प्रश्नांची ठोस उत्तरे मिळवून देणारी जबाबदार संस्था आहे?
ग्रामसभेबाबत शासन प्रतिनिधी-ग्रामसेवकाचा दृष्टिकोन
ग्रामसभेमधली चर्चा ऐकली असता हे लक्षात आले की, ग्रामसेवकाला लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात, जरी ही जबाबदारी प्रामुख्याने सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची असते तरी. असे ही ऐकीवात आले की, ब-याचवेळा ग्रामपंचायत सदस्य, सरपंचासह, ग्रामसेवकाकडे बेकायदेशीरपणे पैसे मागतात आणि विविध सरकारी योजनांमध्ये ‘जुळवून घेण्यास’ भाग पाडतात. जर ग्रामसेवकाने तसे केले नाही तर त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.
तसेच असेही पुढे आले की, कधी कधी ग्रामसेवकही या सगळ्याचा फायदा घेतात – अनेकदा फक्त कागदावर काम दाखवतो आणि त्यातून स्वतःचाही वाटा घेतो. ग्रामसभा झाल्यानंतर ग्रामसेवकाची प्रतिक्रिया खूपच मार्मिक होती. – “आजचा दिवस लोकांचा असतो. मला त्यांचे म्हणणे ऐकावे लागते, बाकी दिवशी माझी अशी जबाबदारी राहत नाही.”
सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा ग्रामसभेबाबत दृष्टिकोन –
असे हे आढळून आले की, सरपंच नेहमीच ग्रामसभा पुढे ढकलण्याच्या बाजूने असतो. या गावात मागील ग्रामसभा झालीच नव्हती. याबद्दल सरपंच यांना विचारले असता, त्यांनी त्याचे कारण सांगितले की – “१५ ऑगस्ट हा आपल्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. या दिवशी लोकांमध्ये भांडणे होतात, हे चांगले नाही. त्यामुळे आम्ही ग्रामसभा पुढे ढकलू इच्छितो.”
सरपंच यांना गावात नक्की काय चालू आहे? हे चांगले माहीत असते, उदारणार्थ, या गावात गह्र्कुल योजनेच्या टप्याटप्याने येणा-या निधी लाभार्थ्यांना मिळण्यासाठी शासकीय इंजिनियरची मान्यता घ्यावी लागते, त्यासाठी इंजिनियर लोकांकडून पैसे मागत असल्याची तक्रार लोकांनी ग्रामसभेमध्ये केली, याची कल्पना सरपंच असून देखील त्यांनी लोकांसमोर तावातावाने इंजिनियरला फोन लावण्याचे प्रयत्न केला.

ग्रामसभेबद्दलची निरीक्षणे-
– ग्रामसभा ही सगळ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे, परंतु लोक याचा उपयोग प्रामुख्याने स्वतःच्या वैयक्तिक मागण्यांसाठी करतात, जसे की घरकुल योजना मंजूर करून घेणे, पेन्शन योजना मिळवणे इत्यादी. प्रत्यक्षात, ही जागा सामूहिक व सर्वांना लागू होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी असावी, जसे की रस्ते, वीज, स्वच्छता इत्यादी.
– दुर्दैवाने, आरोग्य आणि पोषणाचे प्रश्न कोणाच्याही प्राधान्यक्रमात नाहीत. ग्रामसेवकांसह ग्रामपंचायत सदस्यही या विषयांवर बोलत नव्हते. याचे एक कारण असे असू शकते की आरोग्य व पोषण विषय खूपच अमूर्त (intangible) स्वरूपाचे आहेत; त्यांचे मोजमाप करणे कठीण असते, फक्त पायाभूत सुविधा किंवा मनुष्यबळ यांची गणना सोपी असते. मिळणाऱ्या सेवेचा दर्जा आणि गुणवत्तेचे मोजमाप मात्र व्यक्तिनिष्ठ (subjective) असते.
– लोक ग्रामसभेत सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होते, पण प्रत्यक्षात त्यांचा रोख सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होता. मात्र या बाबीकडे कुणीही थेट बोट दाखवले नाही.
– आम्ही ग्रामसभेदरम्यान लोकांना शपथ देण्याची तयारी केली होती, परंतु त्यावेळचे वातावरण शपथविधीसाठी अनुकूल नव्हते. या अनुभवातून हे शिकायला मिळाले की अशा व्यासपीठांवर चर्चा करताना अत्यंत लक्ष केंद्रीत, थोडक्यात आणि ठोस कृती आराखड्यासह बोलणे आवश्यक आहे.
– ग्रामसभा हे संस्थेचे काम मांडण्यासाठी (ब्रँडिंगसाठी) एक चांगले व्यासपीठ आहे. गावमधील लोक सायडाच्या कामाबद्दल चांगले परिचित झाल्याचे दिसून आले.