By Nitin Jadhav

“माझं नाव कोली राजेश पावरा. हे बघा पोरीनो, १६-१७ वर्षी लग्न करू नका. त्यासाठी मी केलेली चूक कायम लक्षात ठेवा. मी १५-१६ वर्षी लग्न केलं होत. मी स्वतः माझ्या नव-याला घेऊन पळून गेली होती. आणि माझा मालक (नवरा) मरून मेला आहे. माझी खूप वाईट परिस्थिती झाली आहे. माझा मालक दारू पिऊन मरून गेला, तो दारू पिऊन मला खूप मारत होता, खूप त्रास देत होता. मी त्याला खूप सांगितलं कि दारू पिऊ नकोस पण त्याने माझ ऐकल नाही आणि मारून गेला. मला दोन मुली आहेत. मुली आहेत म्हणून सगळे मला दुसर लग्न करायला सांगत आहेत. पण या दोन मुलींना माझी पोरगे समजून त्याना शिकवत आहे. मी लवकर लग्न केल्यामुळे माझं कसं वाईट झालं हे माझ्या पोरींना सारखी सांगत असते. गावातले लोक माझ्याबद्दल लई वाईट बोलतात, हि बाई कधी या तर कधी त्या पुरुषाबरोबर फिरते. पण मी खूप खंबीर आहे. माझ्यात हिम्मत आहे कि, मी माझ्या पोरींना चांगलं शिक्षण देऊन त्यांना लग्न १८ वर्षानंतरच करायला लावीन. एवढंच माझं म्हणण आहे.”
मनात आपल्या चुकीचा दाबून ठेवलेला राग, चीड कोलीबाईने आपल्या पावरी भाषेत रडत-चिडत मोकळा केला. याचे निमित्त होत, ‘सीवायडीए’ ने शहादा, नंदुरबारमधल्या १० गावांमधले अभियानाचं! ‘सकल समाज क्रांतीसाठी, पोषणयुक्त आरोग्य अभियान’! लहान वयात लग्न केल्यामुळे मुलीवर आणि तिच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? कुपोषण, अनेमिया यासारखे गंभीर आजारांचे एक मूळ कारण म्हणजे लहान वयात लग्न, हे दुष्टचक्र लोकांपर्यंत पोह्चविण्याचा प्रयत्न या अभियानातून केला गेला.
साबरापाणी या गावात ‘सीवायडीए’ ची टीम आणि अभियानाचा प्रचाररथ संध्याकाळी येऊन धडकला. कोलीबाई शेतावरून आली होती. प्रचाररथाचा भोंगा ऐकून तडक तिने कार्यक्रमाचा मंडप गाठला. ‘सीवायडीए’ च्या १० गाव आरोग्य कार्यकर्त्या आणि टीमने एक झकास पथनाट्य सादर केले आणि ते बघून जणू कोलीबाईला स्फुरणच चढले आणि तिने एका दमात अगदी पोटतिडकीने आपले म्हणणे मांडले.
खूप कौतुक तर वाटलंच तिचं पण जास्त काळजी वाटली, कोलीबाईची. डोक्यात चक्र सुरु झाली ती, या भागात किंबहुना आदिवासी समाजात लहान वयात आणि ती पण पळून जाऊन लग्न का होत असतील? लवकर लग्न होण्याचं आधी ऐकल होत पण पळून जाऊन का? कसे पळून जात असतील? कुठे जात असतील? परत येतात का? असे अनेक प्रश्न मनात आले. त्याची उकल करण्यासाठी मग सुरु झाल्या चर्चा. आम्ही अभियानादरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती/गटाशी या विषयावर चर्चा केल्या.
त्यामध्ये प्रामुख्याने होते ते गावातले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य. त्यांच्या मते, मुल-मुली १० वी पर्यंत कसं-बसं शिक्षण पूर्ण करतात. त्यानंतर करायचं काय? असा मोठा प्रश्न त्याना पडतो, मग गावाबाहेर जाऊन मिळेल ते काम करायचं असा ‘आदर्श’ त्यांच्या आधीच्या पिढीने घालून दिलेला आहे, त्याचे ते अनुकरण करतात. त्यातच त्यांच्याकडे मोबाईल असतो, सोशल-मिडियामुळे ते अजूनच बिथरतात आणि मित्रांच्या संगतीने पोर-पोरी पळून जातात.
गावातले आशा, अंगणवाडी सेविका, एएनएम यांचं काहीसं असंच मत असून आई-वडील कामाच्या विवंचनेत कायम स्थलांतरित होत असतात, पोरांकडे लक्ष कोण देणार? डोळ्यासमोर काही उदिष्ठच नसल्याने मुल-मुली सैराट होऊन लहान वयात पळून जातात, त्यात त्यांना थ्रील वाटत असत.
हे सगळं वरवरचं वाटत होतं, म्हणजे समजत होत पण पटत नव्हत. यातच लक्कडकोट गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. पिंगळेसर यांच्याबरोबर खोलात जाऊन चर्चा झाली. त्यातून लहान वयात पळून जाऊन लग्न या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळाला. त्यामुळे आमचे तर खाड दिशीने डोळेच उघडले. त्यांच्या अनुभवानुसार, आदिवासी पळून जाऊन लग्न करतात हि धारणाचं मुळात शहरी लोकांची आहे. त्यामुळे तुमचे हे शहरी म्हणणे तुमच्या जवळच ठेवा, आदिवासींबद्दल असे चुकीचे काही पसरवू नका. असं त्यांनी खूप परखडपणे सांगितले.
आदिवासी समाज हा मातृसत्ताक मानणारा आणि जगणारा समाज आहे. मुला-मुलींना स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार/मुभा आदिवासी संस्कृती देते. विशेष करून मुलींना, आदिवासी मुली ठरवतात की, मला कोणत्या मुलाबरोबर राहायचे आहे, बरेचवेळा मुलीकडच्या घरून लग्नाला विरोध होतो. कारण रितीनुसार, मुलाने मुलीच्या घरच्यांना पैसे द्यायचे असतात, बाकीच्या समाजात एकदम उलटा रिवाज आहे. मुलाने पैसे देण्यामागे पण कारण आहे की, मुलीचे लग्न झाले कि तिच्या घरात एक कमावणारी व्यक्ती कमी होते.
मुलीच्या घरून विरोध होतो कारण, मुलाची कमवायची ऐपत नसते, पुढे काय करायचं याची स्पष्टता नसते वा तसं मार्गदर्शन करणारी व्यवस्थाच आपण समाज म्हणून त्याना देऊ शकलो नाही. मग आवडलेल्या मुलाबरोबर राहण्यासाठी ते गाव सोडून दुस-या गावात नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणीकडे जातात. त्याला आपण ‘पळून गेले’ अस म्हणतो. दोघांच्या घरी माहीत असत ते कुठे गेले आहेत, काय करत आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखी हे पळून जाण नसत. एक मात्र आहे, मुलीच्या घरचे जर गाव पंचाकडे जाऊन त्यांनी मुलाची तक्रार केली तर मग मुलाला आणि त्याच्या घरच्यांना मुलीला परत तिच्या घरी आणून सोडावे लागते. पुढे जाऊन लग्न झाल्यावर मुलीला कोणत्याही क्षणी वाटलं तर ती तिच्या नव-याला सोडून दुस-याबरोबर जाऊन राहू शकते. मग त्या बाईला कितीही मुले असली तरी दुस-या होणा-या नव-याने तिला तिच्या मुलांसहित स्वीकारणे बंधनकारक असते.
सध्या इतर समाजात ‘लिव्ह-इन’ मध्ये राहणे सुरु झाले आहेच की. तिथे ते शहरी लोकांना मान्य होत, मग आदिवासींच्या या संस्कृतीला आपण का मान्य करत नाही? त्यामुळे पळून जाऊन लग्न त्यावर आरडओरडा करण्यापेक्षा, लहान वयात लग्न होऊन लहानवयात गरोदर राहणे हा चिंतेचा विषय आहे. आदिवासी मुला-मुलींना जीवन साथीदाराचा निर्णय तुमचा-तुम्हीच घ्या, पण मुलीला लहानवयात गरोदरपण येणार नाही याची दक्षता बाळगा. आणि हे करण्यासाठी आदिवासी-बिगर आदिवासी समाजाने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. नाहीतर कोलीबाई आणि तिचे भोग चालूच राहतील. सीवायडीए ने राबविलेल्या पोषण-आरोग्य अभियानामध्ये लहानवयात गरोदरपण नको यावर सगळ्यात जास्त भर दिला. त्याचेच एक उदाहरण म्हणजे कोलीबाईने पुढे येऊन वयात येणा-या पोरींना आवाहन केले.