मातीशी नातं जपणारा प्रवास – प्रभाकर शिंदे यांची प्रेरणादायी कथा

आजच्या काळात शिक्षण घेतलेले, तरुण मनाच्या आकांक्षांनी शहराकडे धाव घेतात. त्यांना वाटतं, की शहरातच यशाची वाट आहे, करिअरचा प्रकाश आहे. गाव, शेती, माती, आणि पारंपरिक जीवन हे मागासलेले वाटते. पण काही व्यक्ती या संकल्पनांना छेद देतात. शहरात जाऊन शिक्षण घेऊन, अनुभव घेतात, परत आपल्या मातीशी जोडले जातात. अशीच एक ही कथा आहे – प्रभाकर भाउसाहेब शिंदे यांची.

माझ गांवसायाळे

सायाळे हे सिन्नर तालुक्यातील एक मध्यम आकाराचं, थोडं मागास, जिल्ह्याच्या टोकावर असणारं पण निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं गाव. या गावात पावसाचं प्रमाण फारसं नाही, सुमारे ६०० ते ७०० मिमी पर्यंतचा पाऊस वर्षभरात होतो, आणि शेतीसाठी पाण्याचं नियोजन करणं हीच खरी कसोटी. अशा गावात जन्मलेले प्रभाकर शिंदे हे लहानपणापासून मातीशी नातं असलेले, पण शिक्षणामुळे गावाच्या सीमांपलीकडे पाहणारे युवक होते.

स्व प्रवास

कोपरगाव या ठिकाणी एफ.वाय. बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील बीआरसी संस्थेमधून रेडिओग्राफीचा डिप्लोमा पूर्ण केला. वडिलांची शेती असूनही, शहरात जाऊन काहीतरी ‘मोठं’ करावं हीच तीव्र इच्छा होती. आणि ती इच्छा घेऊन त्यांनी नवी मुंबईतील एका रेडीओलॉजि लॅबमध्ये नोकरी सुरू केली. तिथे त्यांना मासिक फक्त ₹६,००० इतकं वेतन मिळत होतं. तरीही त्यांनी काम स्वीकारलं,  कारण स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. या लॅबमध्ये तब्बल सहा वर्षं त्यांनी काम केलं.

शहरात नोकरी करत असताना एक गोष्ट मात्र मनाला वारंवार टोचत होती शिक्षण, कौशल्य असूनही शहरात आपल्याला खऱ्या अर्थाने मिळालं तरी काय?  पगार मर्यादित, खर्च अपार आणि समाधान शून्य. त्याच वेळी गावाची आठवण,  शेतीची ओढ,  आणि स्वताची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा अधिकच तीव्र होत गेली. शेवटी त्यांनी निर्णय घेतला गावात परत जायचा.

शहरातलं शिक्षण आणि कामाचा संघर्ष

प्रभाकर शिंदे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सायाळे गावातील रहिवासी. शिक्षणासाठी त्यांनी कोपरगाव  येथे एफ.वाय. बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मुंबईतील BRC संस्थेतून रेडिओग्राफीचा डिप्लोमा पूर्ण केला.

शहरात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नवी मुंबईतील एका लॅबमध्ये २००९ ते २०१३ दरम्यान टेक्निशियन म्हणून ₹६,००० पगारावर काम सुरू केलं. या खासगी लॅबमध्ये ६ वर्ष नोकरी केली. शिक्षण आणि कौशल्य असतानाही, शहरात समाधानकारक काम मिळवणं कठीण जात होतं.

शहरात मोठी स्पर्धा, अपुरी संधी, कमी पगार आणि जीवनशैलीतील अस्वस्थता यामुळे त्यांचं मन गावाकडे ओढ घेत होतं. कितीही वर्षं शहरी जीवनात रुळलं, तरी मनात कुठे तरी आपली माती, आपली जमीन, आणि मूळ व्यवसायाची ओढ सतत वाटत होती.

परतीचा प्रवासओढ मातीची

२०१५ मध्ये प्रभाकर पुन्हा आपल्या सायाळे गावात आले. सुरुवातीला गावातील काही लोकांनी त्यांच्या निर्णयाला वेडं समजलं. पण त्यांच्या डोळ्यात ठामपणा होता. ४.५ एकर जमीन होती, तीच त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात ठरली. त्यांनी पारंपरिक शेतीला झुगारून दिलं आणि ठिबक सिंचन, मल्चिंग, जैविक खतं यांसारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करत कांदा, फळपिके यासारखी नगदी पिकं घेण्यास सुरुवात केली. यातून हळूहळू सर्वांगीण बदल होत गेला.

नियोजन

प्रत्येक हंगामात ते नवीन काहीतरी शिकत होते – पाण्याचं काटेकोर नियोजन, जमिनीचं योग्य परीक्षण, कीटकनाशकांपासून मुक्त पर्यायी उपाय, आणि सेंद्रिय खतांचा प्रयोग. त्यांच्या दृष्टिकोनात प्रयोगशीलता होती आणि प्रयत्नांमध्ये चिकाटी होती. त्यामुळे त्यांच्या शेतीचं उत्पादनही दर्जेदार होत गेलं.

तेवढ्यावरच न थांबता प्रभाकर शिंदे यांनी सामाजिक संस्थांशी जोडून स्वतःचा विचार अधिक व्यापक केला. त्यांना CYDA या संस्थेबाबत माहिती मिळाली. ही संस्था ग्रामीण युवकांना शेतीत नवे मार्ग दाखवते, स्वावलंबी बनवते. प्रभाकर यांनी त्यांच्याशी संलग्न होऊन मार्गदर्शन घेतलं आणि त्यातूनच एक महत्त्वाचा प्रयोग घडला – त्यांनी आपल्या घरी शेणखतावर चालणारा बायोगॅस प्लांट बसवला. यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा गॅस घरच्या घरी निर्माण होतो आणि त्याच वेळी तयार होणारं सेंद्रिय खत शेतीसाठी वापरता येतं.

शेतीत अजून एक पाऊल पुढे टाकत त्यांनी ‘मंडप शेती’ सुरू केली. हवामान नियंत्रित पद्धतीत सेंद्रिय भाज्यांचं उत्पादन घेतलं जातं. या नव्या प्रयोगामुळे त्यांच्या कुटुंबाला रासायनिक मुक्त भाज्या मिळतात आणि आरोग्य राखलं जातं. या सगळ्या प्रयोगांमुळे प्रभाकर फक्त शेतकरी म्हणून नाही, तर पर्यावरणपूरक शेतीचा प्रचारक म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

शेतीपूरक जोडधंदा

सद्यस्थितीत जगाशी तुलना करता फक्त पारंपारिक पद्धतीने शेती करणे व्यावसायिक दृष्ट्या जिकीरीचे झाले आहे. वाढती लोकसंख्या, वाढती महागाई, बदलते जीवनमान, यावर मात करण्यासाठी शेतीपूरक पर्याय शोधणे क्रमप्राप्त आहे हे चाणाक्ष प्रभाकर शिंदे यांनी त्वरित ओळखले आणि शेतीसोबतच अजून काय काय करू शकतो यावर संशोधन सुरु केले. मार्केटचा अभ्यास करून त्यांनी कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी ५००० पक्षी सामावणारे शेड बांधले. तसेच गायी आणि बकरी पालन सुरु केले. या दोन्ही जोडधंद्यातून त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.

स्वप्नं इथेच संपत नाहीत..

त्यांची स्वप्नं इथेच संपत नाहीत. आता त्यांचा लक्ष वेधलेलं आहे – निर्यातीच्या दिशेने. कांद्याचं आंतरराष्ट्रीय बाजारात मोठं स्थान आहे, आणि प्रभाकर त्याच संधीचा अभ्यास करत आहेत. दर्जा, साठवण, वेळेचं नियोजन, आणि ग्राहकाभिमुख उत्पादन ही त्यांची पुढील दिशा आहे.

आज प्रभाकर शिंदे यांचा प्रवास फक्त वैयक्तिक नाही. तो एक सामाजिक आणि प्रेरणादायी प्रवास आहे. शहराच्या झगमगाटानंतर गावाकडे परतून शेतीत आपलं भविष्य पाहणं, प्रयोगशीलतेतून परिवर्तन घडवणं, आणि एक आदर्श निर्माण करणं – ही गोष्ट प्रत्येक युवकाने वाचावी आणि मनात उतरवावी अशी आहे.

गावात राहूनही सर्वार्थाने मोठंहोता येतं, स्वतःच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडवता येतो – हे प्रभाकर शिंदे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे.\

२०१८ पासून शेतीत पूर्णवेळ योगदान

२०१८ पासून प्रभाकर यांनी आपल्या ४.५ एकर जमिनीवर पूर्णवेळ शेती सुरू केली. त्यांनी कांद, सोयाबीन, गहू, चिकू, मका, भाजीपाला पिके या पिकांवर भर दिला, कारण त्या पिकांचा बाजारभाव तुलनेने चांगला असतो आणि योग्य तंत्र वापरल्यास उत्पादनात वाढ करता येते.

ते फक्त परंपरागत पद्धतीने शेती करत नाहीत, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. ठिबक सिंचन, मल्चिंग, माती परीक्षण, जैविक खतांचा वापर, पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि योग्य पिकांची निवड या सर्व गोष्टी त्यांच्या शेतीच्या केंद्रस्थानी आहेत.

त्यांनी आपल्या शेतात माणसाचा अनुभव, शिक्षणाचं ज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचं एक सुंदर मिश्रण निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्या पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही चांगलं येत आहे.

शेती प्रदर्शन व ज्ञान वाढवणं

प्रभाकर नियमितपणे कृषी आणि सबंधित प्रदर्शनात भाग घेतात. इतर शेतकऱ्यांशी संवाद साधून, नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन ती आपल्या शेतीत उतरवतात. ते ‘शिकत-शिकवत’ पद्धतीने शेती करतात. त्यामुळे सायाळे आणि आजूबाजूच्या गावातील तरुण शेतकऱ्यांमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.

स्वप्ननिर्यातदार होण्याचं..

आज प्रभाकर शिंदे यांचं एक मोठं स्वप्न आहे – कांद्याचा निर्यातदार (Export Expert) बनण्याचं. यासाठी ते उत्पादनाची गुणवत्ता, साठवणूक क्षमता, सेंद्रिय उत्पादन प्रक्रिया,  आणि जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करत आहेत. त्यांनी स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे,  जेणेकरून त्यांचे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी त्यांनी आजच सुरवात केली आहे त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी च्या सहकार्याने कांदा खरेदी करून परदेशात ते निर्यात करत आहेत.

शहराचं यश, की गावातली शांतता?

प्रभाकर यांचा प्रवास केवळ शेतीचा नाही, तर एक सामाजिक भाष्य देखील आहे. आज अनेक युवक शिक्षण घेऊन शहरात जातात, पण कौशल्य असूनही त्यांना कमी दर्जाचं काम करावं लागतं. त्यांच्या मनात असते करिअर घडवण्याची धडपड, पण मनामध्ये समाधान नसतं.

प्रभाकर शिंदे यांनी दाखवून दिलं की यशाचा मार्ग फक्त शहरातून जात नाही. आपल्या मातीशी, गावाशी, पारंपरिक व्यवसायाशी प्रामाणिक राहूनही आपण आधुनिक पद्धतींच्या सहाय्याने शाश्वत आणि समृद्ध जीवन जगू शकतो.

By Yogesh Nerpgar (Nashik Unit Head)

Leave a Reply

The Podcast

Stay tuned here for listening and viewing to our amazing Podcasts with amazing & inspiring people.

Impact Jobs

Lastest Stories