चूल-मूलच्या रहाटगाडग्यात अडकलेली कुसुम कशी बनली “बिलिंग काउंटर कॅशिअर”!

By Aarti Berad, Gender Specialist,

Supported by – Bajaj Finserv

अहिल्यानगर स्किल सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या कुसुमच्या आयुष्यात परिवर्तन घडले आहे, न संपणारी आर्थिक संकटे, मर्यादीत शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा सामना करत ती उभी राहिली YouthAid Foundation (YAF) संस्थेच्या साथीनं

कोण आहे कुसुम?

कुसुम किरण साने, वय 35 वर्ष, शिक्षण – दहावीपर्यंत. गाव- शेंडी, ता. व जि. अहिल्यानगर . इतर सामान्य बाई सारखं कुसुमचं जीवन, पती आणि दोन मुल असा त्यांचा चौकोनी संसार. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, त्यांच्या पतींचं सेंट्रिंगचं काम म्हणजे हातावरच पोट, काम मिळाला तर पैसा नाहीतर काही नाही. दोन मुलांचा सांभाळ, घरखर्च आणि भविष्यासाठीची चिंता – या सगळ्या विवंचनेमध्ये तिचं आयुष्य चाललं होतं. पण कायम काहीतरी मोठं आणि वेगळं करायचं? असं कुसुमच्या मनाच्या कोपऱ्यात घर करून बसलं होतं.

कुसुमच्या कष्टाला YAF संस्थेची साथ!

आपल्या संसाराला थोडासा हातभार लागावा म्हणून कुसुमने घरकामाबरोबर प्रायव्हेट कंपनीमध्ये महिला कामगार म्हणून काम करायचं ठरवलं. तसं त्या ‘पारस  आणि ‘श्रीरामकंपनीत कामगार म्हणून कामाला लागल्या, पण  त्या कामात ना स्थैर्य ना कष्टाला म्हणावा तसा मोबदला. १० ते १२ तास काम करून देखील दिवसाला मिळायचे फक्त ₹250/-
त्या म्हणतात – “मी खूप मेहनत करत होते, पण समाधान नव्हतं. स्वतःचं काहीतरी शिकावं, पुढं जावं, असं नेहमी वाटायचं. पण संधी कुठे आणि कशी मिळेल? हे माहीत नव्हतं. ”हळूहळू माझा आत्मविश्वास कमी होऊ लागला तो इतका की, स्वत:च्या क्षमतेवरचं मला शंका यायला लागली.”

एका बाजूला ही सगळी घालमेल, स्वत:वरचा त्रागा आणि झगडा तर दुसऱ्या बाजूला काहीतरी वेगळं करायचा शोधही चालू होता. अशातच त्यांना  अहिल्यानगर स्किल सेंटर विषयी समजलं — जे YAF संस्थेच्या मदतीने चालवले जाते. इथे महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिलं जातं, आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभं केलं जातं. YAF संस्थेने कुसुम यांच्यासारख्या अनेक महिलांसाठी “सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग आणि संगणक प्रशिक्षण (MS Office)” सुरू केलं होतं. त्यात कुसुम सहभागी झाल्या.

YAF संस्थेने कुसुमला काय प्रशिक्षण दिले

सायकल चालवणाऱ्या व्यक्तीला एकदम ट्रक चालवायला दिल्यावर काय गत होईल? तशी गत कुसुमची संगणकचं प्रशिक्षण घेताना झाली. पण तिच्या मदतीला होते ते YAF संस्थेचे प्रशिक्षक. सुरुवातीला त्यांना संगणक हाताळणं अवघड वाटलं. कधी कधी कीबोर्डवरील बटण सापडत नसे, माऊस हलवताना कर्सर कुठे गेला? तेच समजत नसे. पण प्रशिक्षकांनी त्यांना संयमाने मार्गदर्शन केलं.
YAF संस्थेच्या प्रशिक्षणातून कुसुम पुढील गोष्टी प्रामुख्याने शिकल्या —

  1. संवाद कौशल्य – आत्मविश्वासाने बोलण्याची कला
  2. गटांमध्ये काम करण्याचे कौशल्य – सहकार आणि नेतृत्व
  3. राहणीमान सुधारणा – स्वच्छता, वेळेचे नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास
  4. ताणतणाव व्यवस्थापन – आत्मविश्वास वाढवणे

YAF चे प्रशिक्षक प्रत्येक प्रशिक्षणार्थीशी वैयक्तिक संवाद साधायचे. त्यांनी कुसुम यांना देखील प्रोत्साहन दिलं

“तुम्ही करू शकता. सुरुवातीला चुकणं साहजिक आहे, पण सातत्य ठेवा.” यावर विश्वास ठेऊन कुसुमने हार न मानता प्रयत्न चालूच ठेवले.

कुसुमच्या प्रगतीचा चढता आलेख

YAF संस्थेच्या मदतीने त्यांनी मोफत संगणक प्रशिक्षण (MS Office) पूर्ण केलं. त्यात त्या वर्डमध्ये पत्र तयार करायला; एक्सेलमध्ये बिलिंग शीट बनवायला; आणि पॉवरपॉईंटमध्ये सादरीकरण तयार करायला शिकल्या. त्यांनी “प्रिंट” बटण दाबून पहिल्यांदाच त्यांच्या हातात जेव्हा स्वत: बनवलेले डॉक्युमेंट हातात घेतले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळाल्याची जणू पावतीच होती ती.

त्या सांगतात, “आधी काम करत असलेल्या कंपनीमध्ये मी ही डबडी (संगणक) बघितली होती. त्यासमोर बसून हुशार माणसं काहीतरी मोठी-मोठी काम करत असतात, असं काहीतरी ऐकलं होतं. पण मला वाटलं नव्हतं की, मी कधी संगणकावर काम करेन. आता माझे हात थरथरत नाहीत, उलट माझा आत्मविश्वास वाढला आहे.”

कुसुमच्या जिद्दीला मिळालं सन्मानजनक काम!

आज कुसुम ‘साने कोणार्क कॉ शॉपमध्ये बिलिंग काउंटरवर काम करतात.
त्यांना दरमहा ₹12,000/- पगार मिळतो. त्यांच्यासाठी हे काम आता कुटुंबाला नुसता भक्कम आर्थिक आधार नसून त्यांना एक सन्मानजनक जगण्याचा मार्ग पण मिळाला आहे.

त्या अभिमानाने सांगतात, “आता माझ्या हातात संगणक आहे, आणि माझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास. YAF संस्थेमुळे माझं आयुष्य बदललं. आता मी माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करू शकते.”त्यांच्या यशानं गावातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळाली आहे. अनेक महिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्किल सेंटरमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत.

कुसुम यांच्या कहाणीमधून काही महत्त्वाचे धडे मिळतात —

  • योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात.
  • प्रशिक्षणात दिले जाणारे प्रवास भत्ते, वैयक्तिक सल्ला आणि मनोबल वाढवणारे सत्र या सुविधा महिलांच्या सहभागाला चालना देतात.
  • YAF सारख्या संस्थांमुळे ग्रामीण महिलांचे जीवनमान आणि आत्मविश्वास दोन्ही उंचावतात.

अशा प्रकारचे YAF सारख्या संस्थांचे काम देशातल्या इतर गावांमध्ये आणि शहरांमध्ये विस्तारले, तर त्यामुळे हजारो महिलांच्या आयुष्यात “कुसुम” सारख्या नव्या प्रकाशवाटा उजळू शकतात.                         

Leave a Reply

The Podcast

Stay tuned here for listening and viewing to our amazing Podcasts with amazing & inspiring people.

Impact Jobs

Lastest Stories