“एक चहा, एक स्वप्न – सिद्धेश्वर रेस्टॉरंटची गोष्ट”

मनिषा भालेराव (सिन्नर केंद्रप्रमुख, CYDA) यांच्या दूरदृष्टी आणि संवेदनशील नेतृत्वामुळे सविता कोठूरकर सारख्या अनेक महिलांच्या आयुष्याला उभारी मिळाली आहे. महिलांना नव्याने उभं राहण्याची, शिकण्याची आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सविताने केवळ स्वतःचं पुनरुज्जीवन केलं नाही, तर इतर महिलांसाठी एक प्रेरणादायी मार्गही तयार केला.

‘चाय पे चर्चा’ सगळेजणच करतात, पण एका चहाच्या टपरीपासून ते सिद्धेश्वर सिद्धेश्वर रेस्टॉरंट उभं करणा-या सविताच्या मेहनतीला CYDA संस्थेचा सलाम! त्यांच्या खडतर पण यशस्वी प्रवासाची यशोगाथा!

सविता यांचा जन्म सिन्नर तालुक्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. घरात शेती हेच एकमेव उत्पन्नाचं साधन. लहानपणापासूनच शिक्षणाची तीव्र ओढ होती, पण गावात फक्त प्राथमिक शाळा होती. पुढील शिक्षणासाठी लांब जावं लागणार, पण समाजाच्या बंधनांमुळे आणि सुरक्षिततेच्या चिंतेमुळे त्यांच्या शिक्षणाची गती थांबली.

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. नव्या कुटुंबात जबाबदा-या वाढल्या, पण सवितानं घरच्या कामांमध्ये आणि नात्यांमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यांच्या पतीचा  एक छोटासा चहाचा व्यवसाय होता. हळूहळू सविता त्या व्यवसायाचा भाग बनल्या — दूध आणणे, चहा बनवणे, ग्राहकांशी संवाद साधणे अशा अनेक गोष्टी करत त्यांनी व्यवसाय चालवण्यासाठी लागणारी कौशल्य  आत्मसात केली.

संकटांचा अंधार आणि एकटीची लढाई

त्यांच्या आयुष्यात खरी कसोटी  आली, ती पतीच्या आजारपणाची आणि त्यामुळे त्यांच्या अचानक निधनाची!त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त पाच वर्षांचा. घरखर्च, जबाबदा-या , आणि मानसिक तणाव — सगळं काही एकट्याच्या  खांद्यावर. ना कोणतं आर्थिक पाठबळ, ना कुणाचं सहकार्य.

यावर वरकडी झाली ती करोनाची!  कोविड-१९ साथीरोगामुळे देशभर लॉकडाऊन लागला आणि त्यांचा व्यवसाय बंद पडला. उत्पन्न नाही, गरजा मात्र वाढत होत्या. मात्र सवितानं परिस्थितीकडे संधी म्हणून पाहिलं. त्यांनी घरातूनच लस्सी, मिसळ, आणि टिफिन सेवा देण्याससुरू केली. मेहनत, सातत्य आणि चव यांच्या जोरावर ग्राहक वाढू लागले.

आशेचा किरण

याच काळात Youth Aid Foundation आणि CYDA (Centre for Youth Development and Activities) सविताच्या मदतीला धावून आले. सविताने  “Entrepreneurship Development Programme’ मध्ये व्यवसाय प्रशिक्षण घेतले. व्यवसाय नियोजन कसे करावे? ज्यात ग्राहक ओळख, किंमत ठरवणं, खर्च नियंत्रण, लाभ व्यवस्थापन; व्यवसायात लागणारी महत्वाची कौशल्ये ज्यात मुख्य ते संवाद कौशल्य, तसेच तांत्रिक गोष्टी जशा कि डिजिटल पेमेंट्स, सोशल मीडियावर व्यवसाय वाढवण्याचे मार्ग; सरकारी योजनांचा कसा लाभ मिळू शकतो? त्यात PM SVANidhi सारख्या योजना, लघुउद्योजकांसाठी कर्ज अशा अनेक विषयांवर माहिती आणि कौशल्य त्यांना मिळाले.

CYDA हे प्रशिक्षण सर्वसमावेशक विषयांवर आधारित आहेच पण संस्था नव-व्यवसायिकांना व्यवसाय संधी पण देते, सविताला CYDA ने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये केटरिंग करायला संधी दिली. यामुळे सविताला या संधी बरोबर त्यांचं आत्मभान ही जागृत झालं.

‘सिद्धेश्वर रेस्टॉरंट’ – मेहनतीचा ब्रँड

यशाच्या दिशेने एक पाऊल टाकत, सवितानं आपल्या व्यवसायाला नाव दिलं – ‘सिद्धेश्वर रेस्टॉरंट’. टपरीपासून सुरू झालेला प्रवास आता एका छोटेखानी हॉटेलमध्ये बदलला आहे . चहा, नाश्ता, लंच, टिफिन सेवा, आणि छोट्या कार्यक्रमांसाठी केटरिंग – हे सगळं आता त्यांच्या  व्यवस्थापनाखाली होतं. तिचं मासिक उत्पन्न ₹ ५०,०००/- ते ₹ ६०,०००/- च्या दरम्यान आहे. आणि महत्वाचं म्हणजे  तिच्या हॉटेलमुळे आणखी चार लोकांना रोजगार मिळतो

सविता आतापर्यंतचा आपला प्रवास सांगताना म्हणतात “माझ्या पती गेल्यानंतर वाटलं की आयुष्य थांबेल. पण Youth Aid Foundation (YAF) आणि CYDA यांनी मला उभं केलं. त्यांनी मला शिकवलं, समजावलं, आणि व्यासपीठ दिलं. आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्यासारख्या इतर महिलाही हे करू शकतात.”

सविता कोठूरकर यांची कहाणी ही आजच्या नव-व्यावसायिक तरुणांसाठी एक शिकवण आहे:

  • शिकण्याची आणि शिकत राहण्याची जिद्द कधीही सोडू नका.
  • संकटं ही संधी बनू शकतात, त्याला धैर्याने सामोरे जा.
  • योग्य मार्गदर्शन आणि YAF आणि CYDA यासारख्या सामाजिक संस्थांच्या  मदतीने आपण  यशस्वी होऊ शकतो.
  • स्वतंत्र व्यवसाय हा केवळ उत्पन्नाचा स्रोत नाही, तर आत्मसन्मान वाढीचा मार्ग  आहे

सविता कोठूरकर यांचा प्रवास हे ग्रामीण महिला उद्योजकतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. CYDA च्या हस्तक्षेपामुळे तिच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली. संघर्षांतून यशाकडे जाणारा तिचा प्रवास प्रत्येक तरुण-तरुणीला प्रेरणा देतो.

ही केवळ एका स्त्रीची यशोगाथा नाही, तर समाजातील लाखो सवितांसाठी आशेचा दीप आहे.

Leave a Reply

The Podcast

Stay tuned here for listening and viewing to our amazing Podcasts with amazing & inspiring people.

Impact Jobs

Lastest Stories